सावंतवाडीतच क्रीडा संकुल झाले पाहिजे हा आ. केसरकरांचा हेकेखोरपणा

माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची टीका

बांदावासियांशी उद्धट वागणूक निषेधार्थ

बांदा (प्रतिनिधी) :     भारतीय जनता पार्टीच्या जीवावर दीपक केसरकर दोन वेळा आमदार झाले. बांदा गाव सावंतवाडी विधानसभा मतदार संघात येतो याचा त्यांना विसर पडला असावा. सावंतवाडी येथे तालुका क्रीडा संकुलासाठी मुबलक जागा नाही. बांदा येथे सार्वजनिक बांधकामच्या तब्बल १३ एकर जमीनीत सुसज्ज क्रीडा संकुल उभारणे शक्य आहे. मात्र, आ. केसरकर सावंतवाडीतच क्रीडा संकुल उभारण्याचा करीत असलेला हेकेखोरपणा म्हणजे बालहट्ट असल्याची खरमरीत टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केली.
बांदा ग्रामपंचायत कार्यालयात भाजपची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी त्यांनी शालेय मंत्री ना. केसरकरांच्या हेकेखोर कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, बांदावासीयांशी ओरोस येथे स्थानिक आमदार म्हणून जी त्यांची वागणूक होती ती निषेधार्ह आहे. कोणत्याही परिस्थितीत क्रीडा संकुल हे बांदा मध्ये होणार. आता ही जबाबदारी भाजपची झाली आहे.  त्याचे कामही याच वर्षी सुरू होणार आहे. त्यासाठी प्रसंगी वेगळा मार्ग अवलंबून ते पूर्णं करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, रवी मडगावकर, मानसी धुरी, माजी सरपंच मंदार कल्याणकर, उदय धुरी, मधुकर देसाई, आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, बांदा शहरासह परिसरातील ३० हून अधिक गावांची बांदा येथे क्रीडा संकुल व्हावे अशी आर्त मागणी आहे. त्यासाठी स्वातंत्रदिनी ओरोस येथे उपोषण केले. मात्र त्याठिकाणी मंत्री केसरकर यांनी भेट देत जी वागणूक दिली ती न शोभणारी होती. त्यांच्या बालहट्टापायी केवळ ६० गुंठे जागेत क्रीडा संकुल सावंतवाडी येथे होणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचा त्यासाठी विरोध असून त्या विरोधात ठराव सुद्धा झाले आहेत. केवळ स्थानिक आमदार म्हणून बांदाला विरोध म्हणून ते हेकेखोर पद्धतीने वागत आहेत.
बांदा येथे क्रीडासंकुल होण्यासाठी जिल्हा भाजपची पूर्ण ताकद त्यांच्या सोबत आहे. आमच्या वरिष्ठांना ही बाब लक्षात आणून देऊ. प्रसंगी कोणताही मार्ग अवलंबवा लागला तरी ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत क्रीडासंकुल बांदा येथे करणार. त्यासाठी विशेष बाब म्हणून बांदा येथे क्रीडासंकुल होईल असा विश्वास तेली यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.
यावेळी अशोक सावंत, बाबा काणेकर, विनेश गवस, महेश धुरी, श्याम सावंत, गुरु सावंत, रुपाली शिरसाट, अभिलाष देसाई, तनुजा वराडकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, सिद्धेश महाजन आदी उपस्थित होते.