साळशी येथे ‘भल्ली भल्ली भावई’चा जल्लोष

शिवकालीन परंपरेचा वारसा जपत रंगला आगळावेगळा उत्सव

राजेंद्र साटम (शिरगाव)
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथे कर्क संक्रांतीच्या दिवशी गुरुवारी “भल्ली भल्ली भावई…!”च्या जयघोषात शिवकालीन परंपरेचा वारसा लाभलेला भावई उत्सव भक्तिभाव, उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

या दिवशी सकाळी भावई देवीचे पूजन करण्यात आले. देवीस नैवेद्य अर्पण करून दुपारी मानकरी व ग्रामस्थ एकत्र आले आणि भावई उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्री पावणाई देवालयासमोर पारंपरिक भावई खेळ रंगताच संपूर्ण परिसर जल्लोषाने दुमदुमून गेला. आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परंपरेचा धागा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची भावना कृतीतून जपली.

भावई उत्सवातील मातीतील खेळ हे या परंपरेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. उत्सवाच्या उन्मेषात ग्रामस्थ एकमेकांना प्रेमाने अंगाला (माती )चिखल लावून आनंदोत्सव साजरा करतात. रिमझिम पावसाच्या सरींची साथ लाभली की या खेळाची रंगत आणखी खुलते. पावसाने भिजलेली माती, चिखलात मनसोक्त खेळणारे ग्रामस्थ, ढोल-ताशांचा अखंड निनाद आणि “भल्ली भल्ली भावई!”चा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला. विशेष म्हणजे, या खेळात कोणी कोणावर रागावत नाही. उलट हसत-खेळत प्रत्येकजण हा आनंद स्वीकारतो. या भूमीशी असलेले नाते आणि निसर्गाशी एकरूप होण्याची भावना या मातीतील खेळातून अनुभवायला मिळते .

या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे होळदेवाच्या दगडाला दोन्ही हातांनी योग्य पकड देऊन शक्तीप्रदर्शन केले जाते.पावसाच्या पाण्याने निसरडा झालेला हा दगड तोल सांभाळत नेणे ही कौशल्याची कसोटी मानली जाते. हा विधी पूर्ण झाल्यानंतर होळदेव पुन्हा मूळ जागी ठेवण्यात आला.

याचबरोबर ‘सापड’ हा पारंपरिक खेळही उत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे . खेळासाठी चिखलात श्रीफळ पुरले जाते आणि ते बाहेर काढण्यासाठी त्याभोवती गोलाकार ग्रामस्थ बसतात. चिखलामुळे श्रीफळ अधिक घट्ट रुतलेले असल्याने ते सहजासहजी सापडत नाही. प्रत्येकजण हाताच्या कोपराच्या साहाय्याने चिखलातून श्रीफळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ताकद, संयम आणि कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या या खेळात युवकांमध्ये विशेष चुरस पाहायला मिळते . श्रीफळ हाती लागताच ते जल्लोषात होळदेवाच्या ठिकाणी नेऊन परंपरेनुसार फोडण्यात येते .

त्यानंतर सर्वजण ‘चौऱ्याऐंशीच्या चाळा’ येथे नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी गेले. तेथील धार्मिक विधी पार पडल्यानंतर परतताना सोहळ्याला आणखी एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त होते . लहान मुले भातशेतीतून मंदिराच्या दिशेने धावत येतात . चिखलात लोळत पुढे जाणाऱ्या या मुलांना प्रतीकात्मक ‘शिकार’ म्हणून ग्रामस्थांनी त्यांना उचलून ढोल-ताशांच्या निनादात श्री पावणाई मंदिरासमोर आणतात .यानंतर ‘शिवकळा’ काढण्याची कला पार पडते . यावेळी शिवकळेच्या माध्यमातून हा वार्षिक उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याचा हुकूम घेण्यात येतो . त्यानंतर प्रतीकात्मक शिकार मानण्यात आली. प्रतीकात्मक शिकारीचे मुंडके (आंब्याचा टाळ) वाद्यांच्या निनादात मिराशी कुटुंबाकडे नेऊन त्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर तेथे पारंपरिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला आणि भावई उत्सवाची सांगता झाली.

या उत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘देसरूड’ काढण्याची पारंपरिक प्रथा आजही जपली जाते. गावातील रोगराई, अनिष्ट शक्ती व संकटांपासून संरक्षण मिळून ग्रामस्थांना सुख, शांती व समृद्धी लाभावी, अशी लोकश्रद्धा आहे.

या भावई उत्सवापासून इनामदार श्री देव सिद्धेश्वर-पावणाई देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ होतो. कर्क संक्रांतीचा हा दिवस साळशी गावात सण म्हणून साजरा केला जातो. या निमित्त घराघरांत गोडधोड भोजनाचा बेत केला जातो.

सुमारे चार तास चाललेल्या या शिवकालीन भावई उत्सवात लहानथोर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला . ढोल-ताशांचा अखंड निनादात *”भल्ली भल्ली भावई…!”च्या जयघोषाने संपूर्ण साळशी गाव दुमदुमून गेला .

काळाच्या ओघात अनेक लोकपरंपरा इतिहासाच्या पडद्याआड जात असताना, साळशी येथे शिवकालीन भावई उत्सवाचा हा अमूल्य वारसा आजही श्रद्धेने, निष्ठेने आणि एकोप्याने जपला जात आहे.