
विमानतळावरील साधेपणाने जिंकली कर्मचाऱ्यांची मने : नेटीझन्सकडून कौतुक
सिंधुदुर्ग: आपल्या कसदार अभिनयाने आणि साध्या राहणीमानाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले आहे. पुण्याहून विशेष विमानाने त्यांचे सिंधुदुर्ग विमानतळावर लँडिंग झाले. नाना पाटेकर यांच्या या सिंधुदुर्ग दौऱ्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून, त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती.
सिंधुदुर्ग विमानतळावर उतरल्यानंतर नाना पाटेकर यांनी नेहमीप्रमाणेच अत्यंत साधेपणा दाखवत तिथे उपस्थित असलेल्या वैमानिक, केबिन क्रू आणि विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला.
इतकेच नव्हे तर त्यांनी सर्वांसोबत अत्यंत आपुलकीने दोन वेगवेगळे ग्रुप फोटोही काढले. नाना पाटेकर यांचा हा सिंधुदुर्गातील वावर आणि त्यांचा मनमिळावू स्वभाव पाहून उपस्थित विमानतळ कर्मचारी व त्यांचे चाहते भारावून गेले होते.
दरम्यान, नाना पाटेकर यांचे हे विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विमान कंपनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही हे छायाचित्रे पोस्ट करण्यात आली असून, नेटीझन्सकडून नानांच्या या साधेपणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.













