आंबेत–महाड पुलाला बार्जची धडक; अकरा दिवसांनी बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेड (राकेश कोळी) :६ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीदरम्यान सावित्री नदीवरील आंबेत–महाड पुलाला बार्जची धडक बसल्याच्या प्रकरणात अखेर बार्ज मालक रशाद अहमद मुजावर यांच्याविरुद्ध मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी ही कारवाई करण्यात आली.

हवामान विभागाने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी आणि सावित्री नदीला पूर येण्याचा इशारा दिला असतानाही एम.व्ही. अल सुभानी (MV AL SUBHAANI), एम.व्ही. दुलदुल VI (MV DULDUL VI) आणि एम.व्ही. झोया (MV ZOYA) हे तीन बार्ज सुरक्षितपणे बांधून ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप आहे. ६ जुलै रोजी पहाटे पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे बार्जचे दोर तुटून ते भरकटले. त्यापैकी एम.व्ही. अल सुभानी हा बार्ज पुलाखालून वाहत जाऊन खाडीकिनारी अडकला, तर एम.व्ही. दुलदुल VI आणि एम.व्ही. झोया या दोन बार्जनी आंबेत–महाड पुलाला जोरदार धडक दिली.

या धडकेत पुलाचे नुकसान होऊन सरकारी मालमत्तेची हानी झाली. तसेच पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.

या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, मंडणगड उपविभागाचे कनिष्ठ अभियंता ओंकार अशोक शिरगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्ज मालक रशाद अहमद मुजावर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील संबंधित कलमे तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ अंतर्गत माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.