वनसंवर्धनातील योगदानाची राज्यस्तरावर दखल; ‘वनश्री’ पुरस्कार विजेत्या सौ. ज्योती कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

खेड (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेडच्या अध्यक्षा सौ. ज्योती रामदासभाई कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, खेड तालुक्यातील जामगे येथे विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा विशेष सत्कार करून गौरव केला.

रोटरी क्लब खेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात क्लबचे अध्यक्ष मंदार संसारे यांच्या हस्ते सौ. ज्योती कदम यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. रियाज मुल्ला, बिपीन पाटणे, सचिन करवा, निरंजन दळी, डॉ. समीर मंडपे, डॉ. उपेंद्र तलाठी, डॉ. अनिल जोशी, लक्ष्मीकांत पटेल, सिद्धार्थ पाटणे, आदित्य गांधी, कुणाल पाटणे, तन्मय दळी आणि अमीर पाटणे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, पर्यावरणीय आणि लोकहिताच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच जोमाने समाजसेवा सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, शिवसेना माणगाव शहरप्रमुख नितीन दसवते तसेच शिवसेना संपर्क शहरप्रमुख प्रसाद धारिया यांनीही सौ. ज्योती कदम यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. त्यांच्या कार्यामुळे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा सन्मान उंचावला असून, हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण समाजकार्यास मिळालेली राज्यस्तरीय पोचपावती असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जनकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये सौ. ज्योती रामदासभाई कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ‘वनश्री पुरस्कार’ जाहीर केला आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याची व्यापक पातळीवर दखल घेतली गेली असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सत्काराला उत्तर देताना सौ. ज्योती रामदासभाई कदम यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याचे सांगितले. या गौरवामुळे भविष्यात समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि लोककल्याणाच्या उपक्रमांमध्ये अधिक उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.