ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांना ‘स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर

 

बांदा:सावंतवाडी तालुक्यातील बांदा – कास येथील ज्येष्ठ महिला पत्रकार मंगल कामत यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेल्या कामत यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथील बिबवेवाडी भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येत्या ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे भव्य वितरण करण्यात येणार आहे.

मंगल कामत या गेली ३३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी सामाजिक, कला, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध संवेदनशील व महत्त्वाच्या विषयांवर सडेतोड आणि अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या लेखनाची दखल घेऊनच त्यांची या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. एका ग्रामीण भागातील महिला पत्रकाराने ३३ वर्षे अविरतपणे पत्रकारितेचा वसा चालवून मिळवलेल्या या यशामुळे बांदा आणि कास परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.