710 गुणांसह अखिल भारतीय पाचवा क्रमांक, महाराष्ट्रात प्रथम
NEET UG 2026 परीक्षेत महाराष्ट्रातील श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने 720 पैकी 710 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल भारतीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळवत ती देशातील सर्वोच्च महिला उमेदवार ठरली आहे. वर्षभर मोबाईल फोन आणि सोशल मीडियापासून दूर राहून तिने पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पालक, शिक्षक आणि नियमित स्व-अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळाल्याचे श्रावणीने सांगितले. तिचे पुढील लक्ष्य एम्स दिल्लीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचे आहे.
स्व-अभ्यास, सातत्य आणि शिस्तीमुळे मिळाले मोठे यश
बारामती : NEET UG 2026 परीक्षेत श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने 720 पैकी 710 गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम आणि अखिल भारतीय पाचवा क्रमांक मिळवला आहे. यासोबतच ती देशातील सर्वोच्च महिला उमेदवार ठरली आहे. श्रावणीने सांगितले की, संपूर्ण वर्षभर मोबाईल फोन आणि सोशल मीडियापासून दूर राहून तिने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि त्याचाच तिला मोठा फायदा झाला.
श्रावणीने सांगितले की, तिच्या यशामागे पालक आणि शिक्षकांचे सर्वात मोठे योगदान आहे. कठीण काळात शिक्षकांनी सतत मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली, तर आई-वडिलांनी प्रत्येक टप्प्यावर तिची साथ दिली. तिचे वडील कृष्णकांत कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे दोघेही बारामतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तिची मोठी बहीण सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत असून तीच श्रावणीसाठी प्रेरणास्थान ठरली.
गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रावणीचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर तिने शारदाबाई पवार विद्यानिकेतन, मालेगाव येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. NEET परीक्षेच्या तयारीसाठी तिने बारामतीतील कोचिंग संस्थेत प्रशिक्षण घेतले. सरकारी शाळेत शिकूनही इंग्रजी किंवा अभ्यासात कधीच अडचण आली नाही, असे तिने सांगितले.
श्रावणीला जीवशास्त्र विषयाची विशेष आवड होती. मोठ्या बहिणीला वैद्यकीय शिक्षण घेताना पाहून डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले. उत्कृष्ट गुणांमुळे आता तिला एम्स दिल्लीमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळण्याची आशा आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, याची खात्री होती; मात्र देशातील महिला टॉपर ठरेन, अशी अपेक्षा नव्हती, असेही तिने सांगितले.
श्रावणीच्या मते, स्व-अभ्यास हीच तिच्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरली. लहानपणापासूनच पालकांनी स्वतः अभ्यास करण्याची सवय लावली. पाठांतर करण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर तिने भर दिला. तिच्या दैनंदिन वेळापत्रकात सात तास कोचिंग आणि त्यानंतर सहा तास स्व-अभ्यास असा नियमित अभ्यासक्रम होता.
NEET परीक्षेशी संबंधित अनिश्चिततेच्या काळात तिने ध्यान आणि कुटुंबाच्या पाठिंब्याच्या मदतीने स्वतःला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवले. तसेच शिक्षकांनीही कठीण काळात सातत्याने प्रोत्साहन दिले.
भविष्यातील विद्यार्थ्यांना सल्ला देताना श्रावणी म्हणाली की, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्य, स्व-अभ्यास, संकल्पना समजून घेणे आणि वेळेचे योग्य नियोजन यावर भर द्यावा. वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहणे हा त्याग नव्हता, तर डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते, असेही तिने सांगितले.










