वेंगुर्ले शिक्षक समितीचा ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची चळवळ'” : राजन कोरगावकर 

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शालेय शैक्षणिक साहित्याचे वितरण..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

“एखाद्या विद्यार्थ्याला केवळ शैक्षणिक साहित्य देणे म्हणजे मदत नव्हे, तर त्याच्या स्वप्नांना आधार देणे, आत्मविश्वासाला पंख देणे आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय” वेंगुर्ले येथील शिक्षक समितीचा ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ हा कार्यक्रम केवळ सत्कारांचा किंवा साहित्य वितरणाचा सोहळा न ठरता, ‘समाजाच्या सहभागातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची चळवळ'” असल्याचे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ या अभिनव उपक्रमाच्या पाचव्या पर्वाचा सोहळा ‘साई डिलक्स हॉल, वेंगुर्ले’ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने लोकसहभागातून हा प्रेरणादायी उपक्रम चालवला जात आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव यांनी स्वीकारले. यावेळी राज्य शिक्षक नेते श्री.उदय शिंदे, माजी सभापती श्री.जयप्रकाश चमणकर, विद्यमान सभापती श्री. शंकर घारे, पंचायत समिती सदस्या सौ. साक्षी नार्वेकर, सौ. शीतल राऊत, राज्य प्रतिनिधी श्री. दादा जांभवडेकर, श्री. सचिन मदने, श्री.प्रशांत मडगावकर, श्री.संतोष परब, श्री. राजू वजराटकर, जिल्हाध्यक्ष श्री .विठ्ठल गवस, जिल्हा सचिव श्री .तुषार आरोसकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती. निकिता ठाकूर, पतपेढी जिल्हाध्यक्ष श्री. सिताराम लांबर व संचालिका श्रीमती. ऋतुजा जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी कोथमिरे तसेच शिक्षण, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक संघटनेतील विविध मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.

या प्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शालेय शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक, दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक समिती सदस्यांचे पाल्य, गटसाधन केंद्रातील कायम झालेल्या कर्मचाऱ्यांचा समिती परिवारात जाहीर प्रवेश, निवृत्त शिक्षक तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुख यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थी आकस्मिक निधी उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात “शिक्षण हा खर्च नसून समाजाच्या विकासासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. प्रत्येक सक्षम व्यक्तीने एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

संपूर्ण कार्यक्रमात शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचे नियोजन, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा उपक्रम समाजमनाला स्पर्श करून गेला.

‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान आणि विद्यार्थ्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही राष्ट्रनिर्मितीची खरी पायाभरणी आहे,’ हा संदेश देत संपन्न झालेला हा कार्यक्रम वेंगुर्ला तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरला. प्रस्ताविक तालुक्याचे सचिव श्री.रामा पोळजी, आभार श्री.राजू वजराटकर तर संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्रीमती .ऋतिका राऊळ यांनी केले.