उमेश जाधव (मुंढर)
हिरव्या निसर्ग घनदाट वृक्ष वेलिंनी, पानांफुलानी, आणि त्यात मनमोहक श्रावण सरी, शुभ्र धुके यांनी कोकण भूमीवर जणू स्वर्ग स्वर्ग अवतरला आहे.या सृष्टी सौंदर्याची भुरळ पडल्याने अनेक पर्यटक कोकणात पर्यटणाचा आनंद उपभोगण्यासाठी कोकणात दाखल होत आहेत.
स्वर्गाची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे कोकण भूमी. नागमोडी वळणाचे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे, पाना फुलानी बहरलेल्या वृक्ष वेली, डोंगर दऱ्यातील मोहक शुभ्र धबधबे,दाट धुके, विविध पक्षी, आणि आकाशात पडणारे इंद्रधनू पर्यटकाना मोहित करीत आहे.
कोकणातील पावसाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक कोकण प्रांताला विशेष प्राधान्य देत आहेत. पावसाळ्यात सह्याद्री तुन वाहणारे शुभ्र धबधबे म्हणजे जणू पर्यटकांसाठी विशेष पर्वणीच. कोकणातील धबधबे हाऊसफुल झाले आहेत. त्यातून पडणारे शुभ्र तुषार अंगावर घेण्यास प्रचंड गर्दी होत आहे.
जंगल सफारी, समुद्र सफारी करण्यासाठी पर्यटकाचा विशेष कल दिसून येत आहे. नदी नाले यामध्ये पोहण्याचा, पक्षी निरीक्षणाचा छंद ही जोपासला जात आहे. कोकणातील ग्रामीण भागातील ग्राम दैवत, कुल दैवत याकडेही भक्तांचा ओघ वाढत आहे. अनेक देवळात दर्शन, अभिषेक करण्यासाठी पर्यटक कोकणाला पसंती देत आहेत.
हिरव्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा, निळेशार पाणी, पांढरे शुभ्र धबधबे, आकाशातील इंद्रधनू, विविध पक्षी, पक्षी निरीक्षण, हिरवीगार शेती, शेती लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव यासाठी अनेक पर्यटकाची कोकणाला विशेष पसंती आहे.
पर्यटकामुळे येथील हॉटेल व्यवसाय तेजीत आहेत. अनेक पदार्थाची पावसाळ्यात रेलचेल अनुभवायास मिळते. शेतीच्या हंगामामुळे शेतातील शेतीगीत पर्यटकाना आकर्षित करीत आहेत. विविध पर्यटक कोकणात आल्याने कोकण गजबजला आहे पर्यटन ठिकाणगर्दीने ओसंडून वाहत आहेत.
स्वर्गापेक्षा सुंदर हा कोकण.. याची अनुभूती कोकण पर्यटनातून पर्यटकाना मिळत आहे.













