सिंधुदुर्गातील कार्यशाळेत उलघडले अनेक पैलू…
वेंगुर्ले : दाजी नाईक
विकासाच्या नावाखाली मातीची घरे पाडून सिमेंट काँक्रिटची घरे बांधली जात आहेत. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे. मातीशी तुटत चालेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी आणि मातीच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा अनुभव देण्यासाठी “घर मातीचं का आणि कसं बांधायचं?’ यावर चार दिवशीय कार्यशाळा सिंधुदुर्गात घेण्यात आली. या कार्यशाळेत अनेक पैलू उलघडत गेले.
वेंगुर्ले येथील आर्किटेक्ट अजितकुमार परब आणि “डिझाईन जत्रा’चे प्रतिक धामनेर यांनी ६ ते ९ डिसेंबर या चार दिवसीय कालावधीत ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राध्यापक, डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, आर्किटेक्टसह एकूण ५० प्रशिक्षणार्थी सहभागी होते. कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तुळस येथील मांगर फार्म स्टे आणि कुडाळ तालुक्यातील बांव गावाची निवड केली होती. यात प्रशिक्षणार्थींना जुनी जतन केलेली मातीची घरे आणि दगड मातीने नविन बांधलेली घरे दाखविण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मातीच्या घरांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. तसेच त्यांना मातीच्या घरांची आवश्यकता, त्याचे फायदे, त्याचा येणारा खर्च आदींची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे हवामान बदलावर मात करण्यासाठीच्या ठोस उपायांची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली. त्यामुळे ही कार्यशाळा यादगार ठरली.













