साखरपा येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळील सुर्वेवाडी येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत ८४ वर्षीय वृद्ध वसंत रामचंद्र माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सुर्वेवाडी येथील राहत्या घरी वसंत माने आणि त्यांच्या पत्नी वर्षा माने यांच्यात चुलत दिर राजेश आत्माराम माने व त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयितांनी वसंत माने आणि वर्षा माने यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्षा माने यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत होऊन त्यांना चार टाके पडले आहेत. याचवेळी झालेल्या झटापटीत आत्माराम माने आणि रुतीक्षा यांनी वसंत माने यांना जोराचा धक्का दिला, ज्यामुळे ते जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमी वसंत माने यांना तातडीने साखरपा येथील शासकीय रुग्णालयात आणि नंतर रत्नागिरीला हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कर्नाटक येथील रुग्णालयात नेले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १२ जुलै रोजी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान १३ जुलै २०२६ रोजी पहाटे २:०० वाजता वसंत माने यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेत १७ जुलै २०२६ रोजी रात्री देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक २४/२०२६, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.