सामाजिक बांधिलकीतून तोरसोळे शाळेला दोन संगणक संच भेट

परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) :             ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्यामध्ये डिजिटल शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध व्हावी, या सामाजिक जाणिवेतून परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरे पार्क, मुंबई (परळचा राजा) यांच्या वतीने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, तोरसोळे नं. १ ला उच्चप्रतीचे दोन संगणक संच भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला नवे बळ मिळणार असून मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

तोरसोळे येथील ग्रामस्थ तथा मुंबईस्थित अजय पवार आणि शाळेचे माजी विद्यार्थी तसेच मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम (सचिन) पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून शाळेला हे संगणक संच उपलब्ध झाले. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शाळेच्या प्रगतीसाठी यापूर्वीही माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती आणि विविध सामाजिक संस्थांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे. या संगणक संचांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची अधिक प्रभावी सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक विकासाला नवी चालना मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ व मार्गदर्शक संभाजी पवार, बळीराम (तात्या) पवार, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, माजी पोलीस अधिकारी सूर्यकांत पवार, तोरसोळे केंद्राचे केंद्रप्रमुख बापू खरात, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संजीवनी ठुकरूल, शिक्षणप्रेमी उत्तम परब, तोरसोळे सोसायटी चेअरमन अरविंद पवार, याप्रशाळेचे मुख्याध्यापक सत्यवान चव्हाण, मुसांडे मॅडम तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अजय पवार, राजाराम (सचिन) पवार तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.