न्यू इंग्लिश स्कूल भेडशी विजयी
सावंतवाडी:
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत आणि कबड्डी फेडरेशन सिंधुदुर्ग आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या चुरशीच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी (दोडामार्ग) संघाने विजेतेपद पटकावले, तर वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
येथील शांतिनिकेतन स्कूलच्या पटांगणात दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ८ नामांकित संघ सहभागी झाले होते.
अंतिम सामन्यात चुरस
स्पर्धेचा अंतिम सामना दोडामार्ग आणि वेंगुर्ला संघात रंगला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे सामन्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. अखेर न्यू इंग्लिश स्कूल भेडशी (दोडामार्ग) संघाने ३२ विरुद्ध २८ गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचा संघ उपविजेता ठरला. हे सामने पाहण्यासाठी कबड्डी प्रेमींनी मैदानावर प्रचंड गर्दी केली होती. विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कार:
उत्कृष्ट पकड: तुकाराम काळे (दोडामार्ग)
उत्कृष्ट चढाई: प्लेविन रॉड्रिक्स (वेंगुर्ला)
अष्टपैलू खेळाडू: संकेत सावंत (दोडामार्ग)
स्पर्धेचे पंच म्हणून सी.ए. नाईक, अजय जाधव, मयूर सुभेदार, मोहसीन शेख, मिलिंद निकम, विश्राम नाईक, वसिम शेख आणि अलिस्का आल्मेडा यांनी चोख जबाबदारी पार पाडली.
मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
सायंकाळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, निता प्रासादी उपस्थित होते.
तसेच माजी नगरसेवक संजय पेडणेकर, गजानन नाटेकर, कबड्डी फेडरेशनचे दिनेश चव्हाण, माजी कबड्डीपटू तथा आयोजन प्रमुख प्रसाद देऊलकर, आर.डी. बांदेकर, युवा रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष मेहर पडते, अनिकेत पाटणकर, संदिप निवळे, ॲड. प्रसाद नाटेकर, भास्कर आमुणेकर, बाबा आल्मेडा यांच्यासह सावंतवाडी मतदारसंघातून आलेले खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













