सिंधुदुर्ग डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांची माहिती
वैभववाडी प्रतिनिधी :
डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार (दि. २०) रोजी पुकारण्यात आलेले राज्यव्यापी आरोग्य सेवा बंद आंदोलन मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर स्थगित करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने आंदोलन मागे घेतल्याने डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब (DFC), सिंधुदुर्ग यांनीही जाहीर केलेले जिल्हा बंद आंदोलन स्थगित केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी दिली.
डोंबिवलीतील घटनेच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी IMA आणि इतर वैद्यकीय संघटनांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांनीही पाठिंबा जाहीर केला होता. यासंदर्भात रविवारी सकाळी झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला होता.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून (Suo Motu) दखल घेत आरोपींचा जामीन स्थगित करून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. तसेच रुग्णहित लक्षात घेऊन प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन वैद्यकीय संघटनांना केले. न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर IMA महाराष्ट्र राज्याने बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसह रुग्णहिताला दिलेले प्राधान्य ही न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता आणि तत्परतेचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांबाबत कठोर कायदेशीर तरतुदी, अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. राजेंद्र पाताडे यांनी नमूद केले.
डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसून महाराष्ट्र आरोग्य सेवा संरक्षण कायदा अधिक सक्षम करण्यासाठी डीएफसीचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे रुग्णसेवा सुरू ठेवावी आणि वैद्यकीय क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र पाताडे (जिल्हाध्यक्ष), डॉ. मिलिंद काळे (उपाध्यक्ष), डॉ. सुहास पावसकर (सचिव), डॉ. संदीप नाटेकर (खजिनदार) आणि डॉ. सिद्धेश सकपाळ (सहसचिव) यांनी केले आहे.













