विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चिपळूण तालुक्याच्या वतीने आज चिपळूण तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, NTA संदर्भातील प्रश्न तसेच पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता यामुळे लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले असून शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ब्लॅक लिस्टेड किंवा संशयित परीक्षा केंद्रांवर तात्काळ कारवाई करावी, NTA संबंधित जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू करावी, पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. विद्यार्थी व युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चिपळूण तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिवाजी महाराज पुतळा येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाला समर्थन दर्शविल्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष राजेश केळसकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष दत्ता पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, युवकचे चिपळूण शहराध्यक्ष मुन्ना जसनाईक, महिला तालुकाध्यक्ष अरुता अडविलकर, शहर अध्यक्ष रुक्सार अल्वी, शहर उपाध्यक्षा दीपिका कोलतेकर, इम्तियाज मुकादम, नगरसेवक नसरीन खडस, यांच्यासह पक्षाचे तालुका, शहर, युवक व महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व युवक उपस्थित होते. यावेळी शासनाने विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.