‘मुलांनी छोट्या विचारात न राहता आपले विचार मोठे ठेवावेत : आ. प्रमोद जठार 

सावंतवाडी वैश्य समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ‘पुस्तक जगा व पुस्तके वाचा ‘ चे आवाहन

सावंतवाडी: “मुलांनी कधीही छोट्या विचारात अडकून न पडता आपले विचार नेहमी मोठे ठेवावेत. गरिबी हा शाप न मानता त्याला वरदान मानून प्रगती साधावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांसारख्या महापुरुषांची आत्मचरित्रे वाचावीत, त्यांचा आदर्श घ्यावा आणि ‘पुस्तके जगा व पुस्तके वाचा’ असा मंत्र आपल्या आयुष्यात अंगीकारावा,” असे प्रेरणादायी आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले. वैश्य समाज सावंतवाडी व हिंदू वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या प्रसंगी विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांचा वैश्य समाज व युवा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अरुण भिसे यांनी सावंतवाडी वैश्य भवनाच्या कामाचा आढावा घेत समाजात आजच्यासारखीच एकी आणि उपस्थिती कायम राहिल्यास समाजाची नक्कीच प्रगती होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर साहित्यिका पूजा विकास गोवेकर यांनी समाज बांधवांनी अशा कौतुक सोहळ्यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.

या सोहळ्यात वैश्य समाज व हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या वतीने मडुरा येथील दोन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. तसेच तालुक्यातील सुमारे ९० गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक रमेश भाट, युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, महिला अध्यक्षा तनुजा पोकळे, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, उद्योजक बाबा टोपले, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेविका पुष्पलता कोरगावकर, साहित्यिक महेश काणेकर आणि पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी उपस्थित होते. तसेच माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगराध्यक्ष श्वेता शिरोडकर, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, अवधूत नार्वेकर, साबाजी नार्वेकर, रघुनाथ कोरगावकर, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. उमेश मसूरकर यांच्यासह तालुक्यातील ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पुष्पलता कोरगावकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. सूत्रसंचालन संजय म्हापसेकर व सौ. उमा टिळवे यांनी केले, तर डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.