अपहरणाच्या संशयावरून चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी) : मोबाईलवर सतत चॅटिंग करत असल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावून मोबाईल काढून घेतल्याने चिपळूण तालुक्यातील पेढे माळेवाडी येथील १८ वर्षीय तरुणी राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, अज्ञात इसमाने तिचे अपहरण केल्याच्या संशयावरून तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेढे माळेवाडी (ता. चिपळूण) येथे राहणारे फिर्यादी जगदिश यशवंत चिवेलकर (४७) यांनी दसऱ्याच्या सणापूर्वी आपली मुलगी रिया जगदिश चिवेलकर (वय १८ वर्षे ६ महिने) हिला नवीन मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, रिया या मोबाईलवर नेहमी चॅटिंग करत असल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. या कारणावरून वडिलांनी तिला समजावून सांगत रागावले आणि तिच्याकडील मोबाईल काढून घेतला. याच गोष्टीचा राग मनात धरून रिया ही शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच चिवेलकर कुटुंबीयांनी नातेवाईक आणि आजूबाजूच्या परिसरात तिचा कसून शोध घेतला. मात्र, ती कोठेही मिळून न आल्याने तिला गुप्तपणे आणि गैरकायदेशीररित्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे अपहरण केल्याची खात्री वडिलांना झाली. याप्रकरणी जगदिश चिवेलकर यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजून ९ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून चिपळूण पोलीस बेपत्ता तरुणीचा आणि अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत आहेत.












