वनविभागासमोरील तुंबलेल्या पाण्यामुळे चारचाकी गटारात अडकली

पोलीस कर्मचारी महिलेची दुचाकीही रुतली

वाहतूक कोंडीत प्रवासी त्रस्त : ठेकेदारा विरोधात संताप 

सावंतवाडी । प्रतिनिधी :शहरातील वनविभाग कार्यालयासमोर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबल्याने आणि उघड्या गटाराचा अंदाज न आल्याने एक चारचाकी गाडी गटारात अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. अखेर टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात आली. सुमारे १५ दिवसांपूर्वीच या ठिकाणी मोरीचे काम करण्यात आले होते, मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने आवश्यक ती दक्षता न घेतल्याने हे पाणी रस्त्यावर तुंबले असून, याचा नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास सदर चारचाकी गाडीचे चाक पाण्यात न दिसणाऱ्या गटारात अचानक अडकले. गाडी बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर टोईंग व्हॅनला पाचारण करण्यात आले. व्हॅनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यास सुमारे एक तासाचा अवधी लागला. या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये अनेक एसटी बसेस आणि प्रवासी वाहने अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या मदतकार्यात पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी स्वतः पुढाकार घेत सहकार्य केले.

दरम्यान, एका पोलीस कर्मचारी महिलेचेही दुचाकी या गटारात अडकली. स्थानिकांनी ही गाडी बाहेर काढण्यास मदत केली. या गंभीर प्रकाराबाबत नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता, निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने वर्क ऑर्डर मिळण्यास उशीर झाला आणि पर्यायाने काम सुरू होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले.

वास्तविक पाहता, मोरीचे आणि गटारांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करत आता भर पावसाळ्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात कामे सुरू आहेत. मोरीचे काम करताना शेजारील गटाराचे पाणी नेमके वाहून कुठे जाणार, याचे नियोजन संबंधित विभागाने करणे गरजेचे होते. किमान सुरक्षेच्या दृष्टीने उघड्या गटाराच्या कडेला बॅरिकेड्स लावण्याची तसदीही ठेकेदाराने घेतली नाही.

आजची दुर्घटना घडल्यानंतर आणि नागरिक अडचणीत सापडल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. नगरपरिषदेच्या या ढिसाळ नियोजनामुळे सावंतवाडीकर संतप्त भावना व्यक्त करत आहेत. तसेच भर पावसाळ्यात अशा पद्धतीची कामे कशासाठी काढली जातात? असा संतप्त सवालही आता नागरिकांमधून विचारला जात आहे.