सावर्डे विद्यालयात १२५५ विद्यार्थ्यांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी

आरोग्य जनजागृतीसह औषधांचेही मोफत वाटप

चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने मोफत ‘एचबी’ (हिमोग्लोबिन) तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण १,२५५ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. हे शिबिर श्रमिक कृषी संवर्धन संस्था, स्वयंपूर्णता फाउंडेशन रत्नागिरी आणि श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, धरमपूर (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विलास डिके यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम तसेच संतुलित आहाराचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तपासणीत ज्या विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन कमी आढळले, त्यांना आरोग्य विभागामार्फत आवश्यक गोळ्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी श्रमिक कृषी संवर्धन संस्थेच्या श्रद्धा पवार, जानवी डिके आणि संदेश कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, सावर्डे येथील आरोग्य सेवक स्वाती सालवाड व धीरज गवळी, तसेच आशा सेविका श्वेता सावंत, निशा दिंडे आणि प्रियांका वारे यांनी विद्यार्थ्यांच्या तपासणी व नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे शिबीर अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विद्यालयाने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून विद्यालयाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.