शिवाजीपथ ते गणेशघाट आठवडा बाजार दिवशी नो पार्किंग झोन
न. प. च्या सर्वसाधारण सभेत निर्णय
राजापूर | प्रतिनिधी : शहरात दर गुरूवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला शिस्त लावतानाच शहरातील सार्वजनिक शिस्त व स्वच्छतेला प्राधान्य देणे हे नगर परिषदेचे प्राधान्यक्रमाचे काम आहे. त्यामुळे शिवाजीपथ रस्त्यावर गणेशघाट ते वैश्यंपायन गुरूजी पुलापर्यंत आठवडा बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे होणारी वाहतुक कोंडी, आलेला बेशिस्तपणा व नागरिक, वाहन चालक, व्यापारी यांच्या तक्रारी यामुळे या परिसरात व्यापाऱ्यांना बसण्यास कौन्सीलच्या सभागृहात सर्वानुमते निर्णय घेत व तसा ठराव पारित करून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीबाबत सहानुभुतीपुर्वक विचार करताना नगर परिषदेच्या वतीने गुरूवारी गणेशघाट ते कोळवणकर घराच्या मागील बाजुला असलेल्या रॅम्प पर्यंत एका बाजुला नदीपात्रालगतच्या भागात काही व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात बसण्यास परवानगी देण्याचा व हा परिसर अवजड वाहनांसाठी नो पार्किग झोन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी याबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देत आठवडा बाजारातील शिस्त आणि नियमांचे पालक होते की नाही याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सुचनाही प्रशासनाला केल्या. तर आठवडा बाजारात अधिक सुसुत्रिकरण आणताना आठवडा बाजाराच्या बैठक व्यवस्थेची पुर्नरचना करण्याबाबत योग्य पध्दतीने सर्वेक्षण करावे अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
तर शहरातील पथदीप व्यवस्थेबाबत देण्यात आलेला ठेका रद्द करून नव्याने ठेका देण्यात यावा अशी मागणी या बैठकीत सर्वच नगरसेवकांनी केली.
राजापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात झाली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनय गुरव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभीच गतवेळच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या आठवडा बाजारातील ठरावावर चर्चा करण्यात आली. शहरातील शिवाजीपथ रस्त्यावर गणेशघाट ते वैश्यंपायन गुरूजी पुलापर्यंत आठवडा बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे होणारी वाहतुक कोंडी, आलेला बेशिस्तपणा व नागरिक, वाहन चालक यांच्या तक्रारी यामुळे या परिसरात व्यापाऱ्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. हाच निर्णय कायम ठेवावा अशी मागणी यावेळी सर्वच नगरसेवकांनी केली. आठवडा बाजाराला शिस्त लागलीच पाहिजे, वाहतुक कोंडी होणार नाही याच दक्षता घेतलीच पाहिजे अशी मागणीही नगरसेवकांन केली. तर पोलीस प्रशासन व स्थानिक व्यापारी संघाच्या वतीने याबाबत लेखी पत्र देण्यात आले असून नगर परिषदेने या परिसरात बाजारात व्यापाऱ्यांना बसण्यास देऊ नये अशी मागणी केल्याचेही प्रशासनाच्या वतीने सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर चर्चा होऊन नगराध्यक्षा ॲड. सौ. खलिफे यांनी तात्पुरत्या स्वरूपात गणेशघाट ते कोळवणकर घराच्या मागील बाजुला असलेल्या रॅम्प पर्यंत एका बाजुला नदीपात्रालगतच्या भागात काही व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात बसण्यास परवानगी देण्याचा व हा परिसर अवजड वाहनांसाठी नो पार्किग झोन करण्याची परवानगी देण्यात यावी असे आदेश दिले. ही परवानगी तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे नमुद करत या कालावधीत कुणीही नियमांचा भंग केला, प्रशासनाशी वाद घातले तर त्याच्या विरोधात प्रसंगी पोलीस स्थानकात कारवाई करण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशा सुचनाही ॲड. खलिफे यांनी दिल्या.
या बैठकीत शहरातीर पथदिप व्यवस्थेबाबत कामकाजासाठी नियुक्त संस्था बी.ए.सी. इन्फ्राटेक प्रा.लि.आणि व्हिन्सी ग्लोबल प्रा.लि. या कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. मात्र या कंपनीकडून योग्य प्रकारे काम होत नसल्याची भूमिका सर्वच नगरसेवकांनी मांडली व त्यांचा ठेकाच रद्द करण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी पुढील दहा दिवसात या कंपनीकडून योग्य कामकाज झाले नाही तर ठेका रद्द करून पुर्वी प्रमाणे न. प. प्रशासनामार्फतच शहरातील पथदीप व्यवस्था पाहिली जाईल व यासाठी एक लाखाच्या खर्चाला मंजूरी दिली.
या बैठकीत शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रु. १९ कोटी निधीतून प्रस्तावित विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तर शासनाच्या “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान” अभियानांतर्गत कार्माची निवड व स्पर्धेचे निकष याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. कोदवली धरण ते जीएसआर साठवण टाकी समांतर जलवाहिनी (लाईन) टाकण्याबाबत मंजूरी देण्यात आली. राजापूर नगरपरिषद हद्दीतील मालमत्तांच्या कराची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याबाबत नागरिकांवर कोणतीही करवाढ होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. राजापूर नगरपरिषदेसाठी नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राजापूर नगरपरिषद मालकीच्या सार्वजनिक ठिकाणी विंधन विहीर व्यवस्था करणेबाबत ठरावा या बैठकीत पारित करण्यात आला. तर शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करणेकामी कडक अंमलाबवणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत आठवडा बाजारासह अन्य विविध विषयांवर झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेसचे गटनेते ॲड. जमिर खलिफे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, बांधकाम सभापती सुबोध पवार, आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, , पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, नगरसेवक दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, सुभाष बाकाळकर, महेश शिवलकर, सौरभ पेणकर, सिध्दांत जाधव, नगरसेविका सुयोगा जठार, उर्मिला बाकाळकर, साजिया काझी, सान्वी रावण, प्रेरणा नार्वेकर, अफरोज झारी, अमिना गडकरी, जानवी वादक, शबाना मुल्ला, नेहा तानवडे आदींनी सहभाग घेत आपली मते मांडली.













