उंचगावच्या लेकीने जिद्दीच्या बळावर जिंकली शासकीय सेवेची शिखरे

प्रतापसिंह काळे

 *पन्हाळा l प्रतिनिधि*

 

समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) पदावर कोमल गरड यांची निवड; सामाजिक बांधिलकीला मिळाले यशाचे बळ

 

कोल्हापूर : एखाद्या गावाची ओळख त्याच्या रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाही; त्या गावातून उभ्या राहिलेल्या माणसांनी होते. करवीर तालुक्यातील उंचगावने अशीच एक जिद्दी, अभ्यासू आणि संवेदनशील मुलगी महाराष्ट्राला दिली आहे. कु. कोमल चंद्रकांत गरड यांची समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) या पदावर निवड झाली असून, त्यांच्या यशाने उंचगावच्या मातीतल्या कष्टाला आणि संस्कारांना नवी ओळख मिळाली आहे.

 

कोमल या श्री. चंद्रकांत गणपत गरड (छोटस टायपिंग सेंटर) आणि सौ. जयश्री चंद्रकांत गरड (श्री ॲग्रो कंपनी, एचआर.) यांच्या कन्या होत. भाई माधवरावजी बागल हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून बी.एस्सी. (प्राणीशास्त्र) आणि एम.एस.डब्ल्यू. (एचआर.) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. एम.एस.डब्ल्यू.मध्ये A+ श्रेणी मिळवत त्यांनी केवळ गुणच नव्हे, तर सामाजिक जाणिवेचीही उंची सिद्ध केली.

 

सध्या त्या माणदेशी फाउंडेशनमध्ये कार्यरत असून ग्रामीण महिलांच्या डिजिटल साक्षरता, आर्थिक सक्षमीकरण, उद्योजकता विकास आणि विविध सामाजिक उपक्रमांत आजही सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्यासाठी समाजसेवा ही नोकरी नसून जीवनमूल्य आहे.महाविद्यालयीन जीवनात त्यांना २०१९-२० चा ‘बेस्ट एनएसएस स्वयंसेवक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. एक राष्ट्रीय आणि दोन राज्यस्तरीय एनएसएस शिबिरांमध्ये सहभाग घेत त्यांनी नेतृत्वाची छाप पाडली. क्रीडा क्षेत्रातही अंडर-१४ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवत त्यांनी सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची साक्ष दिली.कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक जण घरात सुरक्षित राहिले, पण कोमल गरड गरजूंमध्ये उतरल्या. नाश्ता, कपडे आणि अत्यावश्यक साहित्याचे वाटप करत त्यांनी माणुसकीचा हात पुढे केला. विविध सामाजिक संस्थांसाठी निधी आणि संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही उल्लेखनीय ठरले.

 

“किशोरवयीन मुलींमधील जननेंद्रिय आरोग्याविषयी जागरूकता” या विषयावरील त्यांच्या संशोधनातून ग्रामीण मुलींच्या आरोग्यविषयक प्रश्नांना अभ्यासपूर्ण आवाज मिळाला. संवेदनशील संशोधक, अभ्यासू विद्यार्थिनी आणि समाजाशी नाळ जपणारी कार्यकर्ती अशी त्यांची ओळख अधिक ठळक झाली.आज त्यांची समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) पदावर झालेली निवड ही केवळ एका उमेदवाराच्या यशाची नोंद नाही; तर ग्रामीण भागातील असंख्य मुलींना “मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार असतो” याचा विश्वास देणारी घटना आहे.शासकीय सेवेच्या माध्यमातून रुग्ण, वंचित आणि गरजू घटकांसाठी अधिक परिणामकारक काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, उंचगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.