कुटगाव गिरबाई तलाव ते कर्ली नदी ओहळातील गाळ काढल्याचा परिणाम
आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दोन वर्षे गाळ काढण्याचे काम
स्वप्निल कदम -कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कुटगाव गिरबाई तलाव ते कर्ली नदीकडे जाणाऱ्या ओहळातील गाळ काढण्यात आल्याने यंदा परिसरातील नागरिकांना पूरस्थितीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग व नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून या ओहळातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून नेरूर महसुली गाव, कुटगाव, नेरूर तर्फ हवेली आणि कांडरगाव परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होत होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. तसेच पूरस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.
या गंभीर समस्येबाबत माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधून घेत परिसरातील पूरस्थितीची सविस्तर माहिती दिली. दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती त्यांनी आमदार राणे यांच्यापर्यंत पोहोचवली.
या समस्येची आमदार निलेश राणे यांनी गंभीर दखल घेत जलसंधारण विभागाला आवश्यक सूचना देत पूरस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून कुटगाव गिरबाई तलाव ते कर्ली नदीकडे जाणाऱ्या ओहळातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
ओहळातील गाळ काढल्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होण्यास मदत झाली असून यावर्षी परिसरात पूर्वीप्रमाणे पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे नेरूर, कुटगाव, नेरूर तर्फ हवेली आणि कांडरगाव परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेली पूरस्थितीची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच या कामासाठी सहकार्य करणाऱ्या जलसंधारण विभाग आणि नाम फाउंडेशनचेही ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.













