सावंतवाडी|प्रतिनिधी: सावंतवाडी तालुका व्यापारी उद्योजक व व्यावसायिक संघ, सावंतवाडी यांच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २३ जुलै रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरासाठी पुणे येथील ख्यातनाम अन्नपदार्थ सल्लागार व प्रशिक्षक श्री. अंकुश जोगदंड हे मार्गदर्शन करणार असून अन्नसुरक्षा, प्रमाणपत्र प्रक्रिया, आरोग्य संरक्षण तसेच संबंधित नियमांविषयी सविस्तर माहिती देणार आहेत.
या शिबिरामध्ये किराणा दुकानदार, हॉटेल, खानावळ, बेकरी, मिठाई व्यावसायिक, कोल्ड्रिंक्स व स्टॉलधारक, मासे, चिकन, अंडी व मटण विक्रेते, दूध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते, फरसाण तयार करणारे, भजी, वडापाव, समोसा, चहा विक्रेते, केटरिंग व्यावसायिक, विविध प्रकारच्या धान्यांपासून पीठ तयार करणारे तसेच पाणी बाटली व पिण्याचे पाणी विक्री करणारे व्यावसायिक सहभागी होऊ शकतात.
शिबिरात सुरक्षित अन्न हाताळणी, अन्नसुरक्षा नियमांचे पालन, आवश्यक प्रमाणपत्रे, आरोग्य संरक्षण आणि मार्गदर्शक तत्त्वांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.
संबंधित सर्व व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी व्यापारी उद्योजक व व्यावसायिक संघाचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना नोंदणीसाठी आधार कार्ड व झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.













