सावंतवाडी । प्रतिनिधी :
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आरोग्य निर्देशांकाच्या मूल्यांकनात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाने कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर परिमंडळामध्ये रुग्णालयाने बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबाबतची अधिकृत माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी दिली.
आरोग्य विभागामार्फत रुग्णालयांमधील विविध सेवांचा दर्जा तपासण्यासाठी हे मूल्यांकन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने बाह्यरुग्ण संख्या, आंतररुग्ण संख्या, संस्थात्मक नॉर्मल व सिझेरियन प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, इतर लहान व मोठ्या शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयात दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या यांसारख्या विविध आरोग्य निर्देशांकांची सखोल पाहणी करून हे मानांकन निश्चित करण्यात आले आहे.
एप्रिल २०२६ ते जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एकूण २५ हजार ६९२ बाह्यरुग्ण आणि १ हजार ९०८ आंतररुग्णांवर उपचार करण्यात आले. या कालावधीत २०२ संस्थात्मक प्रसूती झाल्या असून ५४ बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले. तसेच २६ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, १६९ मोठ्या शस्त्रक्रिया आणि ७४६ लहान शस्त्रक्रिया पार पडल्या. वैद्यकीय तपासण्यांमध्ये २७४ रुग्णांची सोनोग्राफी, २ हजार १३५ रुग्णांचे सीटी स्कॅन, २ हजार ८३९ रुग्णांची एक्स-रे तपासणी आणि तब्बल ४८ हजार ७७१ रक्त चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय ४६८ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले असून ६७४ रुग्णांची नेत्रतपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यात आले. विशेष म्हणजे, १ हजार ६९९ अतिरक्तदाबाचे आणि ३३५ मधुमेहाचे नवीन रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात आले आहे.
कोल्हापूर परिमंडळात उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजने प्रथम क्रमांक पटकावला असून, महिला व बाल रुग्णालय कुडाळने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या परिमंडळात द्वितीय स्थान मिळवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा नावलौकिक वाढवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.












