जि.प. बांधकाम घोटाळा: फरार ठेकेदार ओमकार पडते याला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन

 

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पाच संशयितांपैकी फरार ठेकेदार ओमकार नंदकुमार पडते (रा. कुडाळ) याला बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रकरणातील पोलीस तपासाच्या पुढील दिशेकडे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात संशयिताच्या वतीने अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. मिहिर मोंडकर आणि अॅड. गौरव पडते यांनी बाजू मांडली.

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून विविध सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आणि देयके सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित प्रकारातून सरकारी तिजोरीतून रु. ६ लाख ७६ हजारांहून अधिक रक्कम संबंधित खात्यांमध्ये वळती झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अभियंता यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात ओमकार पडते, मोहन केळुसकर, लक्ष्मण राऊळ, मंदार दामोदर तसेच अन्य संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संशयित फरार झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात “गॉडफादर” शोधून काढला जाईल, असे वक्तव्य पालकमंत्र्यांनी यापूर्वी केले होते.

यापूर्वी ओमकार पडते, पाताडे आणि मोहन केळुसकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. मात्र, २० जुलै २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने ओमकार पडते याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित तीन संशयित अद्याप फरार असून त्यांनाही अटकपूर्व जामीन मिळणार का, तसेच तपासात पुढे कोणती माहिती समोर येणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.