रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा पोलिसांच्या जाळ्यात!

सावंतवाडीत छापा ; बुकिंग आयडी ब्लॉक

कणकवली : रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी रेल्वे पोलीसांनी बुधवारी सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले होते. त्या युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर रेल्वे ऍक्ट नुसार १४३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिली. अक्षय देशपांडे ( वय – ३० ) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सावंतवाडी येथील त्या युवकाच्या रेल्वे तिकीट बुकिंग ऑफिसवर रेल्वे पोलिसांनी छापा मारला व त्याचा रेल्वे तिकीट बुकिंग आयडी देखील ब्लॉक केले. रेल्वे ऍक्ट १४३ नुसार दाखल गुन्ह्यामध्ये ३ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दरम्यान संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.