नाधवडे येथील प्रस्तावित MIDC ची जागा बदलणार; ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करत पालकमंत्री नितेश राणे यांचा मोठा निर्णय

​MIDC आता वैभववाडीतच दुसऱ्या पर्यायी जागेवर उभारणार; जिल्हाधिकारी आणि CEO यांना नवीन जागा शोधण्याचे आदेश

​कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग आणि MIDC मुळे तालुक्याच्या विकासाला मिळणार नवा वेग

​वैभववाडी: नाधवडे (ता. वैभववाडी) येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या (MIDC) जमिनीवरून निर्माण झालेला वाद आणि ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता, प्रशासनाने या योजनेची जागा बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी  ही घोषणा केली. ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या भावनांचा आदर करत नाधवडे येथील नियोजित जागा रद्द करून, वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारली जाईल, असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला आहे.

​मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वैभववाडीतील MIDC संदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतर नाधवडे गावाचे मुंबई मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांनी सदर जमिनीच्या १९९६ पासूनच्या इतिहासाबाबतची आणि वस्तुस्थितीदर्शक महत्त्वाची माहिती पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. ग्रामस्थांचा विरोध आणि त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनाने या जमिनीवर एमआयडीसी न करण्याचा निर्णय घेतला.
​या संदर्भात बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले,
​”ग्रामस्थ आणि नाधवडे मुंबई मंडळाच्या भावनांचा सन्मान राखत आम्ही ती जागा बदलण्याचे ठरवले आहे. एमआयडीसी वैभववाडी तालुक्यातच येणार, पण ती दुसऱ्या जागेवर उभी राहील. यासाठी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना वैभववाडी तालुक्यातच दुसरी पर्यायी जमीन शोधण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. लवकरच नवीन जागा निश्चित केली जाईल.”
​तसेच, आगामी काळात होणारा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग आणि तालुक्यात होणारी नवी एमआयडीसी या दोन्ही प्रकल्पांमुळे एका बाजूला कोल्हापूर आणि दुसऱ्या बाजूला वैभववाडी या दोन्ही भागांचा प्रचंड औद्योगिक व आर्थिक फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
​जागा बदलली असली तरी वैभववाडी तालुक्यातील एमआयडीसीचा प्रकल्प वेगाने आणि सकारात्मक पद्धतीने पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी नागरिकांना दिली आहे.