तळवडे येथील श्री जनता विद्यालयात ‘युवक आर्थिक साक्षरता’ कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :

आर्थिक साक्षरता केंद्र, मालवण यांच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), जिल्हा अग्रणी बँक (Bank of India) आणि धान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक २२ जुलै रोजी श्री जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, तळवडे येथे ‘युवक आर्थिक साक्षरता जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील युवकांमध्ये आर्थिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना योग्य आर्थिक व्यवस्थापनाचे धडे देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक (LDM) श्री. ऋषिकेश गावडे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात आर्थिक साक्षरतेचे महत्त्व विशद करून बचत, गुंतवणूक आणि विविध शासकीय विमा योजनांवर उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

​या वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या LDO मिस. बेनाझीर शेख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना डिजिटल फ्रॉड आणि ग्राहक संरक्षण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ओटीपी/पिन फ्रॉड, लॉटरी व बक्षीस फ्रॉड, व्हॉट्सॲपवरील अनोळखी एपीके (APK) फाईल्स व लिंक्स, तसेच ॲनीडेस्क किंवा टीमव्ह्यूअरसारख्या स्क्रीन शेअरिंग ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत त्यांनी सतर्क केले.

“बँक कधीही फोनवर पिन किंवा ओटीपी मागत नाही, पैसे प्राप्त करण्यासाठी युपीआय (UPI) पिनची गरज नसते आणि पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या पोंझी स्कीम्सपासून सावध राहावे,” असे सुवर्णनियम त्यांनी सांगत सायबर फ्रॉड झाल्यास त्वरीत १९३० या हेल्पलाईनवर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले.

​कार्यक्रमात धान फाउंडेशनचे केंद्र समन्वयक श्री. सहदेव परब यांनी अंदाजपत्रक, कर्ज व परतफेड, तसेच पंतप्रधान जीवन ज्योती विमा (PMJJBY), पंतप्रधान सुरक्षा विमा (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) आणि पीक विमा (PMFBY) या योजनांवर मार्गदर्शन केले. या सर्व योजनांचे हप्ते बँक खात्यातून ऑटो-डेबिट होत असल्याने खात्यात पुरेशी शिल्लक ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बँक एफडी, आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एसआयपी (SIP) यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांची माहिती दिली.

​या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेचे मॅनेजर श्री. विनय कुमार, सावंतवाडी तालुका असोसिएट श्रीमती श्रुती रेडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देसाई, सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​युवकांना भावी आयुष्यात उपयुक्त ठरणारे हे मार्गदर्शन अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देसाई यांनी उपस्थितांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले.