रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीत बुधवारी सायंकाळी कोसळलेल्या कंटेनर ट्रकच्या चालकाचा शोध अद्यापही सुरू असून एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथके युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक कंटेनरच्या केबिनमध्येच अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नदीतील वेगवान पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे कंटेनरच्या केबिनचा पत्रा कापण्याच्या कामात मोठ्या अडचणी येत आहेत. चालकापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून खेड शहरातील विसर्जन कट्टा बचाव पथक, मदत ग्रुप आणि स्थानिक स्वयंसेवकही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले आहेत. संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून चालकाचा शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











