महिला ठार
खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील नातुनगर धरण परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास नातुनगर स्टॉपजवळ घडली. झायलो क्रमांक एमएच ०८ झेड ३६९२ या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
या अपघातात सबिया मारुख जसनाईक (वय ३३, रा. भोस्ते मोहल्ला) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इमरान मुरात जसनाईक (वय ४५), अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४) आणि सेहरा मारुख जसनाईक (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर भरणे नाका ब्रिजखाली सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धामची विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच जय हिंद ॲम्बुलन्स, खेड आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर, प्रमोद जाधव व इतरांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.













