जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत रोटरी स्कूलची कु. आर्या खेडेकर द्वितीय

खेड – (प्रतिनिधी)

रविवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी खेड येथील एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूलतर्फे सुवर्णमहोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत रोटरी स्कूलची विद्यार्थिनी कु. आर्या अमित खेडेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेचा गौरव वाढविला.
या स्पर्धेसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून तब्बल २० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये रोटरी स्कूलची कु. आर्या खेडेकर हिने आपल्या ओघवत्या कथनशैलीत मराठी विभागप्रमुख श्री. विलास गावडे यांनी लिहिलेली ‘वास्तव’ ही कथा सादर केली. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या जीवनातील वास्तव दर्शवणारी ही कथा ऐकून प्रेक्षक व परीक्षक मंत्रमुग्ध झाले आणि आर्या खेडेकर हिला द्वितीय क्रमांक बहाल करण्यात आला.
कु. आर्या खेडेकर ही बालवर्गापासूनच रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असून वाचन, वक्तृत्व, गायन, कला आणि क्रीडा क्षेत्रात तिला विशेष रस आहे. यापूर्वी तालुका तसेच जिल्हास्तरावर झालेल्या विविध वक्तृत्व, चित्रकला आणि गायन स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश मिळवले आहे. जिल्हास्तरावर पुन्हा एकदा द्वितीय क्रमांक पटकावल्याने रोटरी स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल कु. आर्या अमित खेडेकर हिला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, चषक, प्रमाणपत्र आणि रोख रुपये ३,०००/- असे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तिच्या या यशामध्ये मराठी विभागप्रमुख श्री. विलास गावडे आणि मराठी विषयाचे शिक्षक श्री. अमर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. आर्या खेडेकर हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.