जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल केदार साठे यांचा दापोली भाजपाकडून सत्कार “संघटनातून विकासाच्या केंद्रस्थानी; केदार साठेंच्या नियुक्तीचे दापोलीत स्वागत”

दापोली : प्रतिनिधी
रत्नागिरी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची जिल्हा नियोजन समितीवर झालेल्या नियुक्तीबद्दल आज दापोली भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार केवळ अभिनंदनाचा सोहळा नसून, साठे यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी दापोली भाजपाचे नेते माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजप महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा सौ. स्मिताताई जावकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा दापोली पंचायत समितीचे सदस्य श्रीराम इदाते, उदय जावकर यांच्यासह पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आणि विशेषतः दापोली तालुक्यात पक्षाला स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करून देण्यासाठी केदार साठे यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत राज्य नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हा नियोजन समितीसारखी महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे उपस्थितांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा निश्चित करणाऱ्या आणि विविध विकासकामांना दिशा देणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवर साठे यांची झालेली नियुक्ती ही दापोलीसाठीही महत्त्वाची संधी मानली जात आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना केदार साठे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानापेक्षा अधिक उत्तरदायित्वाची आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दापोलीसह रत्नागिरीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
केदार साठे यांच्या निवडीमुळे विकास नियोजनाच्या प्रक्रियेत रत्नागिरी जिल्ह्याला अनुभवी नेतृत्वाची साथ लाभणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.