रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीत न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची अनेक प्रकारची प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे, दिवाणी वाद, वीज कंपनी, बँका व पतसंस्थांची थकीत कर्जप्रकरणे, तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसंदर्भातील प्रकरणांचा समावेश करण्यात येणार आहे. या माध्यमातून संबंधित पक्षकारांना दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादांवर जलद, सुलभ आणि सामोपचाराने तोडगा काढण्याची संधी मिळणार आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा व मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे. तसेच ज्या पक्षकारांना त्यांची प्रकरणे लोकअदालतीत ठेवावयाची आहेत, त्यांनी आपल्या वकिलांशी, संबंधित न्यायालयाशी अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी केले आहे.












