महिला प्रशिक्षणार्थीच्या तक्रारीनंतर आयपीएस अधिकाऱ्यावर गंभीर गुन्हे दाखल
सुसाईड नोटमध्ये परस्पर संमतीच्या नात्याचा दावा; पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू
हैदराबादमध्ये एका आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने त्याच्यावर छळ, मारहाण आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोघांमध्ये परस्पर संमतीने प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे दावे समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांनी सर्व पुरावे तपासून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
हैदराबाद : हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या आयपीएस प्रोबेशनर उदय कृष्ण रेड्डी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिला आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही घटना घडल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, उदय कृष्ण रेड्डी यांनी वारंवार त्रास देणे, संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करणे, आक्षेपार्ह संदेश पाठवणे, बदनामी करणे तसेच प्रेमसंबंध मान्य करण्यासाठी दबाव टाकणे, अशा अनेक प्रकारांनी छळ केला. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीमध्ये आणखी गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्याने तिला जबरदस्तीने अडवून ठेवले, तिचे केस ओढले, गळा दाबण्याचा प्रयत्न केला, अनुचित स्पर्श केला तसेच तिला धमकावल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, तिचा खासगी व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड करून तो तिच्या पतीला पाठवत ब्लॅकमेल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी उदय कृष्ण रेड्डी यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्यांनी संबंधित महिला अधिकाऱ्यासोबत जून २०२५ पासून परस्पर संमतीने प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध असल्याचा दावा केला आहे. तसेच हे संबंध दोघांच्या संमतीनेच झाले असून त्यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
रेड्डी यांनी नोटमध्ये असा दावा केला की, संबंधित महिला स्वतःहून त्यांच्या जवळ आली होती. तिच्या संमतीने झालेल्या एका घटनेचे रेकॉर्डिंग त्यांनी केले होते. नंतर हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला. त्यानंतर महिलेने संपूर्ण प्रकरणाचे वेगळे चित्र उभे करून आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सध्या या प्रकरणातील दोन्ही बाजूंच्या दाव्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. उपलब्ध पुरावे, डिजिटल माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे नॅशनल पोलिस अकादमीमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
स्रोत : प्रहार डिजिटल











