Breaking News : कशेडी बोगद्यासमोर अमोनिया गॅसचा टँकर पलटी; गॅसगळती नसल्याने मोठा अनर्थ टळला

खेड : प्रतिनिधी –

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगद्यासमोर गुरुवारी अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. सुदैवाने या अपघातात टँकरमधून कोणतीही गॅसगळती झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा टँकर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. कशेडी बोगद्यासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला. अमोनिया गॅससारखे धोकादायक रसायन टँकरमध्ये असल्याने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, टँकरची तपासणी केल्यानंतर गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोठा दिलासा मिळाला.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची पाहणी करण्यात आली तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.
या अपघातात चालक प्रेमप्रकाश भस्कळ पटेल (वय 42, रा. कमळानगर, जास्मिन रोड, ग्रेटर मुंबई) यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, हा टँकर लोटे एमआयडीसीतील संबंधित कंपनीकडे जात असल्याने कंपनीचे सेफ्टी अधिकारी व प्रतिनिधीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरची सखोल तपासणी करून कोणत्याही प्रकारची अमोनिया गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना किंवा परिसराला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
यानंतर अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. वेळेत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आणि कोणतीही जीवितहानी अथवा पर्यावरणीय हानी टळली. या अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.