गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल जखमी,

पुनस येथील घटना, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लांजा ( प्रतिनिधी) :रानात चरावयाला गेलेल्या बैलावर गवारेड्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना लांजा तालुक्यातील पुनस येथे बुधवारी घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुनस येथील शेतकरी दिनकर चाफडे यांनी आपली गुरे येथील मनोज साळवी यांच्या आंब्याच्या बागेत चरायला सोडली होती .बुधवारी सकाळी या चरणाऱ्या बैलावर गवारड्याने हल्ला केला. या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला. गवा रेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बैलाचे एक शिंग तुटले असून त्याच्या अंगावर जखमा झाल्या आहेत.
जखमी बैलावर पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश धुमाळे यांनी उपचार केले. दरम्यान या घटनेने येथील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे