स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त सावर्डे फार्मसी महाविद्यालयात आरोग्यदायी उपक्रम

चिपळूण (प्रतिनिधी) : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डे यांच्या वतीने तसेच एम. ई. एस. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २२ जुलै रोजी महाविद्यालयात सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर व “महिला आरोग्य” या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वैद्यकीय तज्ञांच्या पथकाने विद्यार्थी तसेच अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, वैधकीय सल्ला तसेच आवश्यक औषधांचे वितरण केले. या शिबिराचा लाभ एकूण ७० विद्यार्थी, ११ अध्यापक व ०७ शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. याचवेळी डॉ. वैभवी निर्मल (सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभाग, एम. ई. एस. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, लोटे) यांनी “महिला आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांमध्ये आढळणारे विविध आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमित आरोग्य तपासणीचे महत्व, संतुलित आहार, वैयक्तिक स्वछता, जीवनशैलीतील बदल तसेच औषधोपचाराबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रश्नोतर सत्रामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, नियमित आरोग्य तपासणी आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रमास प्राचार्य सौ. रुची रोहित भुरण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. शिंदे, कु. महाडीक, कु. वासावे, श्री. पाईकराव, श्री. नरवणे आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.