चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचावा आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजावी या उद्देशाने महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात कलामहाविद्यालयाचे चेअरमन जेष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला. वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास, प्रदूषण कमी करण्यास आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. शेवटी सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. हा उपक्रम समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणारा आणि वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देणारा ठरला.













