दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार
सावंतवाडी | प्रतिनिधी : कारिवडे गावातील गरीब कुटुंबातील प्रणव उमेश भालेकर (वय २०) आणि मंथन एकनाथ कांबळी (वय २०) या दोन तरुणांची भारतीय सैन्य दलात अग्नीवीर म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मंथन कांबळी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आई अंकिता कांबळी यांनी हा सत्कार स्वीकारला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अग्नीवीर प्रणव भालेकर यांनी, “आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझे बालपण आणि दहावीपर्यंतचे शिक्षण कारिवडे येथील प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात झाले. आई-वडील, गुरुजन, शिक्षक तसेच मराठा अकॅडमीच्या शिक्षक-प्रशिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच हे यश मिळवता आले. भारतीय सैन्यात भरती होण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी तालुक्याची समृद्ध सैनिकी परंपरा अधोरेखित करताना, “कारिवडेच्या या दोन्ही तरुणांनी अग्नीवीर म्हणून देशसेवा करताना तालुक्याचे नाव उंचावावे,” अशा शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, गजानन नाटेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, महिला शहरप्रमुख भारती मोरे, शैलेश मेस्त्री, नंदू गावडे, एकनाथ हद्णकर, संजय माजगावकर, राजन रेडकर, संदेश सोनुर्लेकर यांच्यासह सैनिक महासंघाचे माजी सैनिक दिगंबर नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष विष्णू ताम्हणकर आणि माजी सैनिक तलाठी धोंडी उर्फ प्रशांत पास्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना सावंत यांनी केले.











