जि. प. प्राथ. शाळा इन्सुली क्र. ६ मध्ये अवतरली पंढरी; बालवारकऱ्यांच्या विठूनामाच्या गजरात उत्साहात बालदिंडी

सावंतवाडी : आषाढी एकादशीचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली क्रमांक ६ येथे भक्तिमय वातावरणात बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या बालवारकऱ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” अशा नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

 

शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही बालदिंडी संत सोहिरोनाथ मंदिरापर्यंत काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, भगवे पताके आणि तुळशी वृंदावनासह वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

या दिंडीत विद्यार्थ्यांसोबत पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मार्गभर विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग आणि भक्तिगीतांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.