कुडाळमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची भक्तिमय वारकरी दिंडी

स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांची पायी वारी;

संतांच्या वेशभूषेने रंगले कुडाळ शहर

स्वप्निल कदम-कुडाळ:
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था संचलित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठल भक्ती, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी पायी वारकरी दिंडी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात कुडाळ शहरातून काढण्यात आली.

या दिंडीत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, गळ्यात टाळ-मृदुंग, वीणा, डोक्यावर तुळशी वृंदावन तसेच हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण कुडाळ शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेली ही वारकरी दिंडी गांधी चौक मार्गे बाजारपेठेतून मारुती मंदिर येथे पोहोचली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला’ असा हरिनामाचा गजर केला. तसेच ‘स्वच्छता हीच सेवा, विठ्ठल भक्तीचा खरा मेवा’ आणि ‘विठ्ठल नामाचा गजर करू, स्वच्छ वारीचा संकल्प धरू’ अशा घोषणांमधून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

मारुती मंदिर येथे विद्यार्थ्यांनी मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर विठुरायाचे अभंग, भजन व कीर्तन सादर केले. यावेळी महा नैवेद्य अर्पण करण्यात आला. कुडाळ बाजारपेठेतील मारुती मंदिर विश्वस्त व उत्सव कमिटीच्या वतीने दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ व प्रसाद देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

या भक्तिमय पायी वारीमध्ये बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, सौ. अमृता गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरतेशेवटी दिंडी श्री देव ब्राह्मण मंदिर, एमआयडीसी येथे पोहोचल्यानंतर वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला. ‘जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता’ या भावपूर्ण गीताने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या भक्तिमय वारकरी दिंडीची सांगता करण्यात आली.