आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० विद्यार्थ्यांना मोफत सायकली; नगरसेवक किशोर पाटकर यांचा उपक्रम

 

कुडाळ :कुडाळ–मालवण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नवी मुंबई नगरसेवक किशोर अशोक पाटकर यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, कसाल आणि पणदूर येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना ३०० सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या तीनही हायस्कूलना प्रत्येकी १०० सायकली देण्यात येणार असून लवकरच या सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे.

आवळेगाव, कसाल आणि पणदूर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हायस्कूलपर्यंत लांब अंतर पार करावे लागते. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन नगरसेवक किशोर पाटकर यांनी हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासाची अडचण दूर व्हावी, या उद्देशाने सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सर्व सायकली संबंधित हायस्कूलमध्ये पोहोच करण्यात आल्या असून लवकरच त्यांचे औपचारिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती किशोर पाटकर यांच्या वतीने महेश परब यांनी दिली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.