सावंतवाडी : रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे नूतन अध्यक्ष रो. प्रवीण परब यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने ‘वाचू आनंदें या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानाचा शुभारंभ अध्यक्ष प्रवीण परब स्वतः शिकलेल्या समाजसेवा हायस्कूल, कोलझर येथून करण्यात आला. हा उपक्रम दर शुक्रवारी आयोजित केला जात असून आतापर्यंत समाजसेवा हायस्कूल कोलझर, कलंबिस्त, चौकूळ आणि आंबोली येथील शाळांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुकाणू समिती सदस्य भरत गावडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून वाचनाची आवड निर्माण होणे, अवांतर वाचनाची सवय लागणे आणि त्यातून ज्ञानसमृद्ध व्यक्तिमत्त्व घडणे याचे महत्त्व विशद केले.
याशिवाय लेखन कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने बातमी लेखन, कथालेखन, जाहिरात लेखन आदी विषयांवरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.तसेच हा उपक्रम रोटरी वर्ष २०२६-२७ मध्ये जास्तीत जास्त राबवला जाणार आहे.हा उपक्रम पूर्ण वर्ष राबवला जाणार असून माजी अध्यक्ष पमोद भागवत इव्हेंट चेअरमन म्हणून काम पाहणार आहेत.












