आ. योगेश कदम यांनी दिली सिध्दयोग लॉ कॉलेजला भेट

 विद्यार्थ्यांनी केले जल्लोषात स्वागत

चिपळूण (वार्ताहर) : सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे गुरुवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी दापोली-खेड-मंडणगड विधानसभेचे आ. योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या, सर्व प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचालित सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड, या ठिकाणी दुपारी आ. योगेश कदम यांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनासाठी विधी महाविद्यालयामध्ये सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर विविध प्रकारची सजावट सुद्धा करण्यात आली होती. आ. योगेश कदम यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सुरुवातीलाच कॉलेजच्या वतीने आ. योगेश कदम यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांनी कॉलेजमध्ये होणारे विविध उपक्रम यांची प्रोजेक्ट द्वारे एक चित्रपट आमदार योगेश कदम यांना दाखविली.

ज्या ऍक्टिव्हिटी कॉलेजमध्ये घेतल्या जातात आणि येथील विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रातले नॉलेजसुद्धा कसे होईल यासाठी कॉलेज कशाप्रकारे प्रयत्न करते, या संदर्भातली माहिती प्रा. ॲड. हर्षदा कदम, ॲड. केतकी आठवले, ॲड. हमदुले या सर्वांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. योगेश कदम यांनी सांगितले की, तुम्ही कायद्याचे शिक्षण घेत आहात, त्यामागील नेमकं कारण काय आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली. त्याचबरोबर कायदेशीर शिक्षण घेत असताना तुम्ही कशाप्रकारे अध्ययन केले पाहिजे आणि इथून शिक्षण घेवून बाहेर पडल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष न्यायालयामध्ये वकिली सुरू कराल, त्यावेळी तुम्हाला कधीतरी चुकीचे काम करणाऱ्याची सुद्धा बाजू घेवून केस लढावी लागेल अशावेळी तुमची मानसिकता आणि तुमचा अभ्यास याचा कस लागू शकतो. यासंदर्भात त्यांनी काही समर्पक देशभरातील उदाहरणं सुद्धा दिली. कॉलेजमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. अशीच प्रगती करा. आपण सदैव तुमच्या सोबत असू, असेही त्यांनी सांगितले. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला त्यांच्या समवेत शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र आईनकर, तालुका संघटक महेश भोसले, युवा सेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाची तयारी करण्यासाठी अनुजा राऊत, रुही कांबळे व प्राध्यापिका यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे, प्राध्यापिका ॲड. ऐश्वर्या सुर्वे, ॲड. केतकी आठवले, ॲड. अंजली हर्षे, ॲड. हर्षदा कदम, ॲड. हमदुले, सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.