# पुरुषांना त्रास देणाऱ्या कथित लेडी गँगचा पर्दाफाश
महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या अँटी रोमिओ पथकाने वाराणसीमध्ये दोन महिलांना अटक केली आहे. या महिलांवर पुरुषांची छेड काढणे, अश्लील शेरेबाजी करणे आणि त्रास देण्याचे आरोप आहेत. काही पुरुषांनी या प्रकाराला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून या कथित लेडी गँगमधील दोन महिलांना पकडले. या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी रचला सापळा
वाराणसी : महिलांची छेडछाड रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अँटी रोमिओ पथकाने यावेळी दोन महिलांवर कारवाई केली आहे. पुरुषांची छेड काढणे, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी त्रास देणे अशा प्रकारांचे आरोप या महिलांवर करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही महिला सार्वजनिक ठिकाणी उभ्या राहून पुरुषांना लक्ष्य करत होत्या. त्यांच्याकडून अशोभनीय हावभाव आणि टोमणे मारले जात असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या होत्या. काही पुरुषांनी या प्रकाराला कंटाळून पोलिसांकडे मदत मागितली होती.
तक्रारींची दखल घेत वाराणसी पोलिसांनी या कथित लेडी गँगचा शोध सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून रेल्वे स्टेशन परिसरातून दोन महिलांना ताब्यात घेतले. या महिला अनेक दिवसांपासून लोकांना त्रास देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या महिलांबाबत काही दुकानदार, वाहनचालक आणि इतर नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली. या दोन्ही महिलांची चौकशी सुरू असून त्यांच्याविरोधात नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांनी चेहरा झाकण्यासाठी ओढणी वापरली होती. पोलिसांना काही नागरिकांनी त्यांची ओळख पटवण्यात मदत केली. या प्रकरणात आणखी काही साथीदार सहभागी आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
प्रहार डिजिटलला उपलब्ध माहितीनुसार, अँटी रोमिओ पथकाची ही कारवाई परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर करण्यात आली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.











