ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६ ने दयानंद श्रीराम कुबल यांचा गौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद सुलोचना श्रीराम कुबल यांना प्रतिष्ठेचा ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६ प्रदान करण्यात आला. नागपूर येथील अमृत भवन हॉलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांचे सहकारी तसेच इन्फंट इंडिया या सामाजिक संस्थेचे संस्थापक दत्ता बर्गजे आणि सौ. संध्या बर्गजे यांच्या हस्ते दयानंद कुबल यांचा गौरव करण्यात आला. आदिवासी समाज आणि एचआयव्ही बाधित मुलांच्या सेवेसाठी तब्बल पाच दशके आयुष्य समर्पित करणाऱ्या या समाजसेवी दांपत्याच्या हस्ते सन्मान स्वीकारण्याचा क्षण अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असल्याची भावना दयानंद कुबल यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना दयानंद कुबल म्हणाले, “मला पद्मभूषण बाबा आमटे यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना तो स्वतः बाबा आमटे यांनीच दिल्याचा आनंद आणि समाधान मला लाभले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक जबाबदारीने समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारा आहे.”

दयानंद कुबल यांच्या नेतृत्वाखाली कोकण संस्थेने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध लोककल्याणकारी उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करत त्यांनी कोकण संस्थेला विश्वासार्ह आणि लोकाभिमुख व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.

समाजातील अधिकाधिक गरजू व्यक्तींपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा संकल्प दयानंद कुबल यांनी केला असून, २०३० पर्यंत ३० लाख लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते आणि कोकण संस्था सातत्याने कार्यरत आहेत.

दयानंद कुबल यांच्या कार्याचा गौरव यापूर्वीही अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी करण्यात आला आहे. सर रतन टाटा एक्सलन्स अवॉर्ड, सकाळ मीडियाचा ब्रँड ऑफ कोकण, कोकण सन्मान, युवा सामाजिक कार्यकर्ता यांसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील कोकण संस्थेला आजपर्यंत सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून संस्थेने सामाजिक क्षेत्रात वेगळी आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.

पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ समाजसेवक दत्ता बर्गजे यांनी कोकण संस्था आणि दयानंद कुबल यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. समाजपरिवर्तनासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित करत, “सामाजिक क्षेत्रात नव्या पिढीने जिद्दीने आणि समर्पणाने काम कसे करावे, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे दयानंद कुबल,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दत्ता बर्गजे यांनाही देशभरात १५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला. अमृत भवन हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६ मिळाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान केवळ दयानंद कुबल यांचाच नसून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक संवेदनशील कार्यकर्त्याच्या सेवाभावाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.