मॉडर्न हायस्कूल साखरी-नाटे व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
राजापूर (वार्ताहर): केंद्र शासनाच्या ‘एक झाड माँ के नाम’ या अभियानाला प्रतिसाद देत मॉडर्न हायस्कूल साखरी-नाटे व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती फेरी आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन गावातून जनजागृती फेरी काढली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “वृक्ष हेच जीवन”, “एक झाड माँ के नाम” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नागरिकांना अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर शाळेच्या परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आंबा, आपटा, साग, आवळा अशा रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होण्यास तसेच समाजात हरित संदेश पोहोचविण्यास मोठी मदत झाली.
या उपक्रमात शाळेचे फरहाना फणसोफकर, किरण टिळेकर, अकबर कादर,शबनम पावसकर, साक्षी टिळेकर,फातीमा नाखरेकर, साध्वी लाड, खदिजा सोलकर, मिनल पावसकर, अनुजा कांबळे, शमशाद होडेकर, आरसिन, सिमरन मौला तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. उपस्थितांनी हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.













