मंडणगड प्रतिनिधी :
मंडणगड तालुक्यात निर्माण झालेली वाळू टंचाई दूर करून म्हाप्रळ (सावित्री खाडी) येथील वाळू साठवणूक प्लॉटला तातडीने मंजुरी देण्यात यावी तसेच ड्रेझरद्वारे वाळू उपसा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंकर यांनी केली आहे. तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाळूची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकामांसह घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच विविध शासकीय विकासकामांवर होत आहे. सावित्री खाडी अंतर्गत म्हाप्रळ -बाणकोट येथील वाळू गटांची मागील वर्षीच कायदेशीर टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष वाळू उपसा सुरू झालेला नाही. वाळू उपसा करून साठवणूक करण्यासाठी म्हाप्रळ येथे निश्चित करण्यात आलेल्या प्लॉटला अकृषक (NA) परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदर परिसर सी आर झेड तसेच कांदळवन क्षेत्राच्या जवळ असल्याने संबंधित पर्यावरणीय व महसूल नियमांनुसार आवश्यक मंजुरी प्रक्रियेला विलंब होत आहे
अधिकृत व नियमित वाळू साठवणूक प्लॉट उपलब्ध नसल्यामुळे टेंडरधारकांना ड्रेझरचा ताबा घेऊन प्रत्यक्ष वाळू उपसा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनस्तरावर टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही नागरिकांना वाळू उपलब्ध होत नसल्याते म्हालुंगकर यांचे म्हणणे आहे.
वाळूअभावी अनेक गरीब व गरजू नागरिकांची घरकुले अर्धवट अवस्थेत असून, शासकीय विकासकामांनाही त्याचा फटका बसत आहे. बाजारातील खासगी वाळूचे वाढलेले दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनल्याचे निवेदनात नमूद आहे.
कांदळवन, सी.आर.झेड व पर्यावरणाशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करून म्हाप्रळ येथील वाळू साठवणूक प्लॉटला आवश्यक ती तात्पुरती अथवा विशेष बाब म्हणून कायदेशीर मंजुरी देण्यात यावी. तसेच संबंधित टेंडरधारकांना आवश्यक परवानग्या व प्रक्रिया पूर्ण करून ड्रेझरद्वारे वाळू उपसा व नियमानुसार पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
तालुक्यातील रखडलेली घरकुलांची कामे, शासकीय विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांची बांधकामे मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.













