पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू : करुळ येथील घटना

तब्बल आठ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडला

शेतीच्या कामासाठी जात असताना घडली दुर्दैवी घटना

वैभववाडी प्रतिनिधी :
करुळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६०) यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात जात असताना ही घटना घडली. घटनास्थळापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. तब्बल आठ तास शोधमोहीम राबविल्यानंतर करुळ-जामदारवाडी सीमेवरील नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सह्याद्री जीव रक्षक टीमला यश आले.
सदानंद कदम हे मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त शेतात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. घरापासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रातून जात असताना ही दुर्घटना घडली. रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

कदम वाहून गेल्याची माहिती वाडीमध्ये वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सह्याद्री जीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस व महसूल विभागाची यंत्रणाही गावात पोहोचली. सकाळपासून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. नदीला मोठा पूर असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. मात्र, जीव रक्षक पथकातील सदस्यांनी दोरी व लाईफ जॅकेटच्या साहाय्याने नदीपात्रात शोधकार्य सुरू ठेवले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, तहसीलदार सूर्यकांत पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना केल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी एनडीआरएफच्या पथकाशीही संपर्क साधला.

दुपारी सुमारे अर्धा तास शोधमोहिमेतील जीव रक्षकांनी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर करुळ-जामदारवाडी सीमेवरील नदीपात्रातील झुडपांमध्ये सदानंद कदम यांचा मृतदेह आढळून आला. सह्याद्री जीव रक्षक टीम व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी नायब तहसीलदार दिलीप पाटील, मंडळ अधिकारी श्री. गवस आदी उपस्थित होते.

शोधमोहीमेदरम्यान वैभववाडी भाजप अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, श्रावणी रावराणे, बंड्या मांजरेकर, पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, करुळचे सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, अरुण कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, रवींद्र पवार, संतोष साटम, पोलीस पाटील उदय कदम, सचिन पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच तलाठी शुभांगी साबळे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, पोलीस अधिकारी फकरुद्दीन आगा, पोलीस हवालदार सी. ए. माने, आर. बी. तळसकर, मोहन राणे, जितेंद्र कोलते, संदीप राठोड आदींनी शोधमोहीमेत सहभाग घेतला.
या शोधमोहिमेत सह्याद्री जीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्यासह राजेंद्र वारंग, विजय सावंत, अमर शिंदे, रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण, आनंद शिंदे, सत्यवान सरफरे, पांडुरंग शिवगण, संजय कदम, सत्यविजय मोरे, विजय पवार, तुकाराम पवार, मंगेश शिवगण आणि सूरज शिंदे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.