त्यानंतर पुन्हा पाणी कपात
रत्नागिरी : प्रतिनिधी
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी रत्नागिरी शहरात सध्या दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन येत्या सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी शहरातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेकडून घेण्यात आला आहे.
गुरुवार, दि. ५ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी सोमवारी होणारी नियमित पाणी कपात एक दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक सोमवारी मान्सूनचे नियमित आगमन होईपर्यंत शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करावे.
दरम्यान, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी सभापती निमेश नायर यांनी केले आहे.













